स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब
*राजमाता जिजाऊ माँसाहेब संकटसमयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या!* ---------------------------- ---------------------------- राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयात जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जिवे मारण्यासाठी अफजलखान आला, पन्हाळा वेढा, आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले, पण अशा कठीण प्रसंगी जिजाऊ माँसाहेब डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही, संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत, याउलट संकटसमयी जिजाऊ लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. संकटाला संधी समजून त्यावरती त्यांनी यशस्वी मात केली. राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकियांची चाकरी करण्यापेक्षा भूमि...