शाक्त राज्याभिषेक

 *शाक्त शिवराज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन!*


                             शिवाजीराजांच्या जीवनातील क्रातीकारक घटना म्हणजे शाक्त राज्याभिषेक! शिवाजीराजांनी दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 रोजी करून सनातनी परंपरा नाकारली. पहिल्या राज्याभिषेक प्रसंगी सनातनी धर्माने त्यांना शूद्र ठरवून छळले, हे महान संस्कृत पंडित छत्रपती संभाजीराजे यांनी शिवाजीराजांच्या निदर्शनास आणून दिले व संभाजीराजांच्या सल्ल्यानुसार शिवरायांनी शाक्त राज्याभिषेक केला, असे प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात.


                            शिवाजीराजे प्रवाहपतीत नव्हते. उठले आणि कोणाचे तरी ऐकून शाक्त राज्याभिषेक केला, असे घडले नाही. ते विचारी होते. ते विवेकी होते. ते प्रगल्भ होते. ते जसे लढवय्ये होते तसेच ते तत्वज्ञानी होते. पहिला वैदिक राज्याभिषेक केल्यानंतर त्यांनी दुसरा शाक्त राज्याभिषेक केला, याला कांहीतरी निश्चितच कारण असेल.  ते दूरदृष्टीचे राजे होते. ते सनातनी धर्माच्या विरोधात होते. ते समतावादी होते. ते महिलांचा आदर करणारे होते. ते उपेक्षित-वंचित वर्गाचे हितकर्ते होते. ते बुद्धिप्रामाण्यवादी होते, म्हणूनच ते शाक्त राज्याभिषेक करण्याची हिंमत करू शकले. शाक्त राज्याभिषेक करण्यासाठी अगोदर वर्णवर्चस्व, अहंकार नष्ट करावा लागतो. शिवाजीराजे हे वर्णवर्चस्ववादाच्या विरोधात होते. त्यांनी जातीव्यवस्थेला सुरुंग लावला, त्यामुळेच त्यांनी हे धाडसी पाऊल टाकले.


                           भारतीय इतिहासातील शिवाजीराजे हे पहिले राजे आहेत की ज्यांनी शाक्त राज्याभिषेक केला. शाक्त राज्याभिषेकाचे महत्व समजण्यासाठी व ते मांडण्यासाठी विविध ज्ञानशाखांचा अभ्यास, मनाची प्रगल्भता लागते की जी प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांच्याकडे होती. शाक्त म्हणजे शक्तीचे उपासक, महिलांचा आदर सन्मान करणारे, समतावादी विचारसरणी जोपासणारे होय.


                                         शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्या विरुद्ध लढा दिला. तसेच बहुजन समाजाला शूद्र ठरवून त्यांचे हक्क-अधिकार नाकारणाऱ्या सनातनी व्यवस्थेविरुद्ध ते लढले. तसेच बहुजन समाजाचे आर्थिक शोषण करणाऱ्या सरंजामदाराविरूद्ध देखील ते लढले. एकाच वेळेस त्यांना तीन आघाड्यावर लढावे लागले. ते म्हणजे मोगल, सरंजामदार आणि सनातनी !. मोगलांविरुद्ध लढून त्यांनी जनतेला राजकीय स्वातंत्र्य दिले. सरंजामदारविरुद्ध लढून त्यांनी जनतेला कृषी, आर्थिक स्वातंत्र्य दिले. तर सनातन्याविरुद्ध लढून शिवाजीराजांनी जनतेला सांस्कृतिक, धार्मिक स्वातंत्र्य दिले. शाक्त राज्याभिषेक हा सनातन्यांच्या विरोधातील लढाईचा विजय आहे.


                            शाक्त राज्याभिषेकावरून हे स्पष्ट होते की शिवाजीराजे आणि संभाजीराजे या पितापुत्रात मतभेद नव्हते, तर एकमेकांवर चांगलाच प्रभाव होता. संभाजीराजांनी शिवरायांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला, तर शिवाजीराजांना संभाजीराजांच्या पराक्रम आणि विद्वतेबद्दल प्रचंड कौतुक होते. संभाजीराजांच्या सल्ल्यानुसारच शिवाजीराजांनी भारतीय समाज व्यवस्थेला कलाटणी देणारा दुसरा-शाक्त-राज्याभिषेक केला.


                          शाक्त राज्याभिषेकामुळे काय घडले ?, शरद पाटील सांगतात की दुसऱ्या राज्याभिषेकामुळे शिवाजीराजे हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभावळीच्या सुभेदाराला "ब्राह्मण म्हणून मुलाहिजा बाळगला जाणार नाही" असे खडसावून सांगू शकले, कारण मध्ययुगीन काळात ब्राह्मण चुकला तरी तो दंडनीय नसायचा, तर तो पूजनीय असायचा. दक्षिणदिग्विजय प्रसंगी श्रीशैल्यमला गेल्यानंतर त्यांनी कदलीवनात महायोगिनींशी तत्त्वज्ञानावर चर्चा केली. याबाबतचे सविस्तर विवेचन शरद पाटील यांनी 'शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण,महंमदी की ब्राह्मणी?' या महत्वपूर्ण ग्रंथात केलेले आहे.


                         आजच्याच दिवशी 1873 साली महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सनातनी धर्म नाकारला. सत्यशोधक समाज ही आधुनिक भारतातील पहिली अब्राह्मणी संस्था आहे की ज्यांनी सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनाच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन केले.


                          शाक्त राज्याभिषेक आणि सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments

Popular posts from this blog

डॅा बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील योगदान उपेक्षित का ?

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड